विंडहोक येथील लेडी पोहंबा हॉस्पिटलमध्ये नामिबियाचे राष्ट्रपती हेज गिंगोब यांचे आज निधन झाले असून मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ होते. कार्यवाहक अध्यक्ष नांगोलो मुम्बा यांनी राष्ट्रपतींच्या निधनाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली आहे. गिंगोब यांची पत्नी, मोनिका गिंगोस आणि त्यांची तीन मुले यावेळी हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते .
नामिबियाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या गिंगोब यांनी मागच्या महिन्यात खुलासा केला होता की, नियमित वैद्यकीय तपासणीनंतर कर्करोगाचे निदान झाले असून त्यावर उपचार चालू आहेत. ८२ वर्षीय हेज गींगोब यांची ८ जानेवारी रोजी कोलोनोस्कोपी आणि गॅस्ट्रोस्कोपी झाली, त्यानंतर बायोप्सी करण्यात आली, असे त्यांच्या कार्यालयाकडून गेल्या महिन्यात सांगण्यात आले होते.
2015 पासून दक्षिण आफ्रिकन राष्ट्राचे अध्यक्ष असलेले गिंगोब या वर्षी त्यांचा दुसरा आणि अंतिम कार्यकाळ पूर्ण करणार होते, गिंगोब यांनी नामिबियाचे पंतप्रधान म्हणून प्रदीर्घ काळ काम सांभाळले होते. तसेच सर्वाधिक काळ राष्ट्रपतीपद भूषविणारे ते तिसरे व्यक्ती होते.
नामिबियाचे कार्यवाहक अध्यक्ष नांगोलो मुम्बा यांनी शांततेचे आवाहन केले आणि त्याच पोस्टमध्ये म्हटले की, “या अत्यंत दु:खाच्या क्षणी, मी देशाला शांत राहण्याचे आवाहन करतो.तसेच देशाच्या भविष्याबाबत थोड्याच दिवसात इतर घोषणा केल्या जातील असे जाहीर केले आहे. आपल्या निवेदनात, नांगोलो म्बुम्बा म्हणाले, “नामिबियाच्या राष्ट्राने लोकांचा एक प्रतिष्ठित सेवक, मुक्तिसंग्रामाचे प्रतीक, आपल्या राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आणि नामिबियाच्या घराचा आधारस्तंभ गमावला आहे.”