बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुती लवकरच आपला उमेदवार जाहीर करेन. मी उमेदवार आहे असं समजून मला मतदान केलं पाहिजे, अशी तंबी कार्यकर्ते आणि मतदारांना देतानाच, काही लोक भावनिक होतील, माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगतील, पण खरंच ती शेवटची निवडणूक असेल का ? असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
तसेच निवडणूक जाहीर होण्याआधीच त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधातील आगामी काळातील आपले इरादे स्पष्ट केले. आतापर्यंत एकमेकांच्या कामाचं महत्त्व सांगत, एकमेकांच्या कामाची स्टाईल सांगत ताई-दादा मतं मागायचे. परंतु यावेळी राष्ट्रवादीतील फुटीमुळे पवार कुटुंबात मोठा संघर्ष होणार असल्याची चिन्हे आहेत.
बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने संभ्रमात असलेल्या बारामतीमधील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांनी भावनिक न होता व्यावहारिक राहण्याचा सल्ला देता. तसेच येत्या लोकसभेत आपल्याला महायुती देईल, त्याच उमेदवाराचे काम करायचे आहे असे सांगताना भावनिक न होता सुप्रिया सुळे यांच्याविरोधातच काम करायचे आहे, असे अप्रत्यक्षपणे सांगून लोकसभेच्या प्रचाराचा नारळच फोडला.