उत्तर प्रदेशमधील अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. मात्र या भव्य राम मंदिरावर हल्ला होणार असल्याची माहिती मुंबई नियंत्रण कक्षाला मिळाली आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलीस कामाला लागले असून सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहम पांडे नावाच्या व्यक्तीने मुंबई नियंत्रण कक्षाला शनिवारी मध्यरात्री फोन करून ही माहिती दिली होती. सोहम पांडेचा मित्र नंदकिशोर सिंग हा आरपीएफचा कर्मचारी आहे. नंदकिशोर सिंग हा आग्रा ते मुंबई प्रवास करत होता. तेव्हा आग्रा अदपतपूर येथील रहिवाशी सोहेल कुरेशी हा राम मंदिरावर हल्ला करणार असल्याची माहिती त्याला समजली होती. दरम्यान सोहम पांडे याने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाने संबधित सर्व यंत्रणांना याची माहिती देत सतर्क केलं आहे. विशेष म्हणजे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने कुरेशी आणि आरपीएफ कर्मचारी दोघांचाही मोबाईल क्रमांक पोलिसांना दिला आहे.
दरम्यान अयोध्येत दररोज हजारो भाविक दर्शन घेत असून मोठ्या प्रमाणावर गर्दीही होत आहे. काही गैरप्रकार घडू नये, भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून अयोध्येत सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे.