उल्हासनगर गोळीबार प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर भाजप कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. आपसांतील वैमनस्य आणि जमिनीचा वाद यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे.
या धक्कादायक घटनेनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच ही घटना आगामी निवडणुकीच्या तोंडावर घडल्याने महायुतीमध्ये फुट पडणार अशा चर्चा रंगल्या आहेत. तसेच विरोधकांनी शिंदे गट आणि भाजपमधील हे गँगवॉर असल्याचे म्हटले आहे. अशातच आता या चर्चांवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.
माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीमध्ये एखाद्या घटनेमुळे काहीही फरक पडत नाही. काही घटना अवधानाने घडत असतात. तसेच गृहखाते या घटनेची सखोल चौकशी करत आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अशा घटना अनेकवेळा घडल्या आहेत. मात्र, त्या घटनांचे उदाहरण देऊन आजची ही घटना झाकता येणार नाही.
गोळीबार करणे हे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत. ही घटना आम्हाला मान्य नाही. झालेला जो प्रकार आहे तो दुर्दैवी असून पुढील काळात राज्याला गालबोट लागणार नाही अशी काळजी सर्वांनी घेतली पाहीजे. तसेच गृहखात्याचा अहवाल आल्यानंतर पोलीस कारवाई करतीलच पण पक्ष देखील यावर कारवाई करणार आहे, असेही बावनकुळेंनी सांगितले.
दरम्यान, महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाब राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी माहिती दिली आहे. महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. पण सध्या त्यांची प्रकृती काहीशी चिंताजनक असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत, अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली आहे.