उल्हासनगर येथे शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर भाजप कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. आपसांतील वैमनस्य आणि जमिनीचा वाद यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेदरम्यान महेश गायकवाड यांना सहा गोळ्या लागल्या होत्या त्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. तसेच आता महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी रूग्णालयात जाऊन गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. यावेळी शंभूराजे देसाई यांनी माध्यमांशी बोलताना गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती दिली आहे.
यावेळी शंभूराजे देसाई म्हणाले की, मी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार फक्त महेश गायकवाड यांना पाहिले. त्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितले की, महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांना योग्य ते उपचार दिले जात आहेत. डॉक्टर सर्वोत्तपरी प्रयत्न करत आहेत.