झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीने अटक केली आहे. त्यानंतर विशेष PMLA कोर्टाने हेमंत सोरेन यांना ५ दिवसांची कोठडी दिली आहे. त्यानंतर झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ झालेली पाहायला मिळाली. चंपाई सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज झारखंड विधानसभेत चंपाई सोरेन सरकारचा विश्वासदर्शक ठराव पार पडणार आहे. या विश्वासदर्शक ठरावामध्ये हेमंत सोरेन सहभागी होणार आहेत. रांची येथील विशेष न्यायालयाने हेमंत सोरेन यांना याबद्दल परवानगी दिली आहे.
हे जाणून घ्या
हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर चंपाई सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला राज्यातील आमदारांचा पाठिंबा आहे हे व बहुमत सिद्ध करण्यासाठी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पार पडणार आहे. सत्ताधारी पक्षामध्ये झारखंड मुक्ती मोर्चा,काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांचा समावेश आहे. ८१ सदस्यीय विधानसभेत सत्ताधारी पक्षच एकूण ४७ आमदार आहेत. तर त्यांना सीपीआय (एमएल) (एल) च्या एका आमदाराचा देखील पाठिंबा आहे.
विरोधी पक्षांमध्ये २५ आमदारांसह भाजपा, तीन आमदारांसह ऑल झारखंड युनियन पार्टी, राष्ट्रीवादी काँग्रेस पार्टी, सीपीआय पक्षाचा प्रत्येकी एक आमदार व तीन अपक्ष आमदार यांचा समावेश आहे. सत्ताधारी पक्षाने विश्वासदर्शक ठराव होईपर्यंत आपले अनेक आमदार हैदराबादला ठेवले होते. ठरावाच्या अगोदर ३७ आमदार झारखंडमध्ये परतले आहेत. कोणतीही गडबड होऊ नये यासाठी सत्ताधारी पक्षाने ही काळजी घेतली आहे.
अटक झालेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील रांची येथील विधानसभेत मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी फ्लोअर टेस्टमध्ये आले आहेत. ईडीने घेतलेल्या तीव्र आक्षेपानंतरही रांची येथील विशेष न्यायालयाने हेमंत सोरेन यांना विश्वासदर्शक ठरावामध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.