भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्या प्रकरणाचा पोलीस स्टेशनमधील एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. जमिनीच्या वादातून ही घडल्याचे बोलले जात आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतच उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केल्याने शिंदे गटाचे मंत्री आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
उल्हासनगर गोळीबार प्रकरणात न्यायालयाने भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केले आहेत. पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून आता शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी शिवसेनेच्या सात मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल या ७ मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी भूमिका काही मंत्र्यांनी घेतली आहे.
आता हा गोळीबार का केला? याबाबतचे कारण गणपत गायकवाड यांनी सांगितले आहे. गणपत गायकवाड यांनी सांगितले की, “10 वर्षांपूर्वी मी एक जागा घेतली होती. तर या जागेवर शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांनी जबरदस्ती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. महेश गायकवाड हे कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होते.”
“काल संध्याकाळी महेश गायकवाड 400 ते 500 जण घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आले होते. त्यावेळी माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात असताना त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. मला हा प्रकार सहन झाला नाही. कारण माझ्यासमोर ते माझ्या मुलाला हात लावत असतील तर माझा जगून काय फायदा? त्यामुळे मी काल रात्री आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला”, असे गणपत गायकवाड यांनी सांगितले.