पुणे (आळंदी) दि.५ – संपूर्ण विश्वाला भारताची गरज आहे. आपले ज्ञान आणि विज्ञान ही आपली परंपरा आहे. हे ज्ञान आपल्याला विश्वाला द्यायचे आहे. त्यामुळे कट्टरतेच्या सर्व भिंती तोडून एकसंध, एकरस, सुखी सुंदर भारत बनवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
▪️श्री क्षेत्र आळंदी येथील स्वामी गोविंददेव गिरी महाराजांच्या ‘गीता भक्ती अमृत महोत्सवी’ कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ. भागवत यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर स्वामी राजेंद्रदास महाराज, स्वामी गोविंददेव गिरी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी, सदानंद महाराज, मारोतीबाबा कुरेकर महाराज, लोकेशमुनी, प्रणवानंद महाराज आदिंची प्रमुख उपस्थिती होती. अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्यासह उपस्थित मान्यवर, संतांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
▪️राष्ट्रातील शाश्वत मूल्यांची जपणूक व आचरण करणे हे सर्व संत महंतांचे योगदान महत्त्वपूर्ण असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध संत महंत एकत्रित येऊन प्रबोधन करणार आहेत, हा अमृत योग असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले. महाभारतानंतर ज्याप्रमाणे नैमिषरण्यात ऋषी संमेलन होऊन शास्त्रावर मंथन झाले, त्याचप्रमाणे इथेही या निमित्ताने अनेक संत महंत एकत्रित येत आहेत.त्यातून विश्व कल्याणासाठी मंथन होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.