आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह दिल्ली मद्य धोरण घोटाळा परणी जेलमध्ये आहेत. कोर्टाकडून विशेष परवानगी घेऊन ते आज, सोमवारी राज्यसभेत पोहचले. परंतु, त्यांचे प्रकरण संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे प्रलंबित असल्यामुळे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना शपथविधीची परवानगी नाकारली.
दिल्लीतील मद्य घोटाळ्यात ईडीकडून आप नेते संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. मात्र राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी आणि संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आपल्याला जामीन मिळावा, अशी याचिका सिंह यांनी कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाकडून संजय सिंह यांना खासदारकीची शपथ घेण्यासाठी राज्यसभेत हजर होण्याची परवानगी देण्यात आली. मात्र संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठीची मागणी फेटाळून लावण्यात आली होती.
ईडीने आपल्या आरोपपत्रात मद्य घोटाळ्यातील अन्य आरोपी दिनेश अरोरा याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याचा आरोप केला होता. या बैठकीला संजय सिंह उपस्थित होते. दिनेश अरोरा यांनी ईडीसमोर दिलेल्या कबुली जबाबानुसार, संजय सिंह यांची पहिल्यांदा एका कार्यक्रमात भेट झाली. यानंतर ते मनीष सिसोदिया यांच्या संपर्कात आले. दिल्ली निवडणुकीपूर्वी आप नेत्यांनी मिळून केलेला हा निधी उभारणीचा कार्यक्रम होता, असा मोठा आरोप करण्यात आला आहे.
ईडीच्या आरोपपत्रानुसार, संजय सिंह यांच्या सांगण्यावरून, दिनेश अरोरा यांनी दिल्लीतील निवडणुकांसाठी पक्षनिधी गोळा करण्यासाठी अनेक रेस्टॉरंट मालकांशी चर्चा केली. एवढेच नाही तर 32 लाखांचा धनादेशही मनीष सिसोदिया यांच्याकडे सुपूर्द केला. उत्पादन शुल्क विभागाकडे प्रलंबित असलेले दिनेश अरोरा यांचे एक प्रकरण संजय सिंह यांनी सोडवल्याचा आरोप ईडीने केल्याचे सांगितले जात आहे.