भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्या प्रकरणाचा पोलीस स्टेशनमधील एक सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. जमिनीच्या वादातून ही घडल्याचे बोलले जात आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतच उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप केल्याने शिंदे गटाचे मंत्री आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, ”भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तथ्यहीन, बिनबुडाचे ज्याच्यामध्ये कसलाही अर्थ नाही , असे जे आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर व्यक्तिशः केलेलं आहेत. हे चुकीचे आहेत. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने योग्य ती कार्यवाही करावी अशा पद्धतीचे मत आम्ही देवेंद्र फडणवीसांसमोर मांडलेले आहे. आमच्या मताची योग्य दखल फडणवीस घेतील.”
उल्हासनगर गोळीबार प्रकरणात न्यायालयाने भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केले आहेत. पोलीस मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून आता शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी शिवसेनेच्या सात मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल या ७ मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी भूमिका काही मंत्र्यांनी घेतली आहे.