सध्या ईदगाह मशीद आणि श्रीकृष्ण जन्मभूमीबाबतचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमी आणि इदगाहा मशिदीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याची सुनावणी सुरू असताना भारतीय पुरातत्व विभागाने एक महत्वाचा खुलासा केला आहे. एएसआयने १९२० मधील ऐतिहासिक पुरावे आणि दस्तऐवज यांच्या आधारावर महत्वाची माहिती सादर केली आहे. वादग्रस्त जमिनीबाबत माहिती अधिकारांत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ही माहिती सादर करण्यात आली आहे.
माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ASI ने सांगितले, मुघलांचा बादशाह औरंगजेबाने मशिदीचा मार्ग तयार करण्यासाठी या ठिकाणावरील एक हिंदू मंदिर पाडले होते. मात्र आरटीआयला दिलेल्या उत्तरात ‘कृष्णजन्मभूमीचा’ उल्लेख नसून, त्या आवारात असलेल्या केशवदेव मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु असल्याने या माहितीचा प्रतिसाद कायदेशीर लढाईत महत्वाचा ठरू शकतो.
उत्तर प्रदेश येथील मैनपूरी येथील अजय प्रताप सिंह यांनी आरटीआय दाखल करत देशातील मंदिरांबाबत माहिती मागवली होती. यामध्ये श्रीकृष्णजन्मभूमीच्या ठिकाणाबद्दल देखील माहिती मागवण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना पुरातत्व विभागाने म्हटले आहे की, १९२० मधील राजपत्राचा आधार घेत पूर्वी मशिदीच्या ठिकाणी केशवदेव मंदिर होते. तिथे मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली.