रेल्वेत नोकरी मिळण्यासाठी तरूणांना आता जास्त वाट पाहावी लागणार नाहीये. कारण रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता भारतीय रेल्वेमध्ये दरवर्षी रिक्त पदांवर भरती करण्याचा निर्णय अश्विनी वैष्णव यांनी घेतला आहे.
त्यासाठी रेल्वेचे वार्षिक कॅलेंडर देखील जारी करण्यात आले आहे. यामध्ये, उमेदवारांना वर्षाच्या महिन्यानुसार भरती अधिसूचना, परीक्षा, प्रशिक्षण, विविध श्रेणींमध्ये रिक्त पदांवर नियुक्ती याबद्दल आधीच माहिती असेल.
रेल्वे बोर्डाने 2 फेब्रुवारी रोजी सर्व रेल्वे भरती मंडळांसाठी (RRBs) केंद्रीकृत रोजगार अधिसूचनेबाबत सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये RRB दरवर्षी जानेवारी-मार्च दरम्यान असिस्टंट लोको पायलट (ALP) च्या रिक्त पदांवर भरती करण्यासंदर्भात अधिसूचना जारी करेल. तसेच एप्रिल-जून दरम्यान तंत्रज्ञ पदांची भरती करण्याची योजना आहे. गैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणी (NTPC) पदांसाठी, पदवीधर आणि 12वी पास, कनिष्ठ अभियंता आणि पॅरामेडिकल पदांसाठी भरतीची प्रक्रिया जुलै ते सप्टेंबर दरम्यान सुरू होईल. तर ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये, लेव्हल-1 म्हणजेच गॅगमन, पॉइंटमॅन, सहाय्यक पदांसाठी अधिसूचना जारी केली जाईल.
रेल्वेमध्ये नोकऱ्यांच्या भरतीसाठी वार्षिक कॅलेंडरची गरज असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. त्यामुळे रेल्वे परीक्षेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना मदत होणार आहे. याबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले की, नोकरीच्या सूचना आता वर्षातून चार वेळा प्रसिद्ध केल्या जातील. त्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळेल आणि अनिश्चित काळासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.