राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाले आहे. याबाबतचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. तसेच निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या या निकालावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावर भाष्य केले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा निर्णय अपेक्षित आहे, कारण निवडणूक आयोगाने मागील अनेक वर्षात सातत्याने जी भूमिका घेतली आहे, जेव्हा समाजवादी पार्टी संदर्भात वाद उभा राहिला होता किंवा इतर पाच प्रकरणात इलेक्शन कमिशनची हीच भूमिका राहिली आहे. लोकशाहीत बहुमताने जो निर्णय घेतला जातो तो निर्णय महत्त्वाचा असतो.
अजित पवार यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. मला अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकार त्यांच्या नेतृत्वात उत्तम काम करेल. बहुमताला महत्त्व आहे पण फक्त बहुमताच्या आधारावर निर्णय झाला नाही तर इतर सर्व बाबींचा विचार करून निर्णय झाला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2019 मध्ये ज्यांनी लोकशाहीचा मुडदा पाडला त्यांना लोकशाही काय असते हे समजले आहे. त्यांना लोकशाहीने त्यांची जागा दाखवलेली आहे. मी चपराक वैगेरे म्हणत नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.