धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओलने 12 वर्षांपूर्वी बिझनेसमन भरत तख्तानीसोबत लग्न केले होते. दोघांचे वैवाहिक जीवन खूप चांगले चालले होते. ईशा सोशल मीडियावरही तिच्या पतीसोबतचे फोटो शेअर करत असे, पण आता त्यांच्यात पूर्वीसारखे काही राहिले नाही. दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ईशा देओल आणि भरत तख्तानी लग्नाच्या 12 वर्षानंतर वेगळे होत आहेत. दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
त्यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या जीवनातील या बदलामुळे आमच्या दोन मुलांचे सर्वोत्कृष्ट हित आणि कल्याण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि राहील. तसेच आमच्या गोपनीयतेचा आदर केला जाईल याची आम्ही अपेक्षा करत आहोत.
ईशा देओलने लग्नाच्या वाढदिवासादिवशी भरत तख्तानीसोबतचा शेवटचा फोटो पोस्ट केला होता. हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट फोटो होता. याशिवाय हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघेही शेवटचे एकत्र दिसले होते. तर आता ते दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले आहेत.
या स्टार कपलने सोशल मीडियावर अनेकदा फोटो शेअर केले आहेत. मात्र, 2023 मध्ये ईशा देओलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये भरत दिसला नव्हता. याशिवाय एका सोशल मीडिया यूजरने 17 जानेवारीला Reddit वर एक पोस्ट शेअर केली आणि त्यात सांगितले की, ईशा आणि भरत आधीच एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. त्यामुळे ते आता सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत नाहीत. एवढेच नाही तर या पोस्टमध्ये युजरने असा दावाही केला आहे की, भरत त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे.