मनसे पक्षाचे तीन महत्वाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट झाल्याचे वृत्त समोर येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. तब्बल अर्धा ते एक तास या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे कळते आहे. सध्या राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडी पाहता या भेटीत मनसे-भाजपा युतीवर चर्चा झाली का? महायुतीत सामील होण्यासंदर्भात ही भेट झाली का असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. ज्या पद्धतीने राज्यातील राजकारण सध्या फिरत आहे, त्यादृष्टीने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.
मागील अनेक दिवसांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे अनेकदा व्यासपीठावर एकत्रितपणे दिसले आहेत. कालच्या भेटीमुळे महायुती मनसेसोबत युती करण्यासंदर्भात चाचपणी करत असल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेला सोबत घेण्यासाठी महायुती ही चाचपणी करत असल्याचे म्हटले जात आहे. कारण गेल्या आठवड्यात या तीन नेत्यांची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील चर्चा झाल्याचे वृत्त समोर येत आहे. भाजपाच्या नेत्यांनी देखील राज ठाकरेंची अनेकदा भेट घेतल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, काल घेतलेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितली. अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायची होती त्यामुळे काल आम्ही त्यांची भेट घेतली. मनसे पक्षाला महायुतीत घेण्यास एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असल्याचे कळते आहे. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.