केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. पक्षांतर करणाऱ्या आणि संधीसाधू नेत्यांबद्दल नितीन गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मूळ विचारांशी तडजोड करून काही संधीसाधू नेते सातत्याने सत्ताधारी पक्षाबरोबर राहण्याचा प्रयत्न करत असतात, असे वक्तव्य नितीन गडकरींनी केले आहे. तसेच चांगेल काम करणाऱ्याला कधीच सन्मान मिळत नाही, असेही गडकरींनी म्हटले आहे. गडकरींच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच गडकरींचा रोख नेमका कोणाकडे होता? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, सध्या राजकारणात असे काही काही लोक आहेत जे ना उजवे ना डावे आहेत, ते फक्त संधीसाधू आहेत. ते लोक या ना त्या मार्गाने सत्ताधारी पक्षाशी ताळमेळ राखून असतात. त्यांना नेहमी सत्ताधारी पक्षासोबत कसे राहता येईल याची ते काळजी घेत असतात.
पुढे कोणाचेही नाव न घेता नितीन गडकरी म्हणाले, स्वत:च्या मूळ विचारसरणीवर ठाम असलेले किंवा निष्ठावान नेत्यांची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे. मी नेहमी गमतीने म्हणत असतो की, सत्तेत कोणताही पक्ष असो, एक गोष्ट कायम असते ती म्हणजे चांगले काम करणाऱ्याला कधीच सन्मान मिळत नाही. तसेच वाईट काम करणाऱ्याला कधीच शिक्षा होत नाही.
आमच्यातील मतभेद, वाद ही आमची समस्या नाही. काही लोकांकडे विचार नाहीत ही मोठी अडचण आहे. पण काही नेते असे आहेत जे त्यांच्या मूळ विचारसरणीसह उभे आहेत. ते त्यांच्या विचारांची प्रतारणा करत नाही आणि त्यांच्यात सातत्याने दृढनिश्चय दिसून येतो. मात्र, अशा नेत्यांची संख्या खूप कमी असून हे लोकशाहीसाठी चांगले नाही, अशी खंतही नितीन गडकरींनी व्यक्त केली.