शरद पवार गटाकडून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्रात विजय निश्चय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बोलताना रोहित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. जरी मला ईडीने जेलमध्ये टाकले तरी माझ्या जागी माझे कुटुंब येथून लढेल, असे सूचक वक्तव्य रोहित पवारांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवारांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. तर या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
पुढे रोहित पवारांनी राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर भाष्य केले. “काल रात्री घेतलेला निर्णय हा संविधानाच्या बाजूने नव्हता. भाजपचा निवडणूक आयोग एक सेल झाला आहे. मागील काही वर्षांपासून भाजपकडून संविधान बाजूला ठेवण्याचे काम सुरू आहे. भाजपचा 2014 ते आत्तापर्यंत सविधानाला तडा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच भाजपने दबाव आणून सर्व खासदार स्वत:च्या बाजूने केले तर भविष्यात निवडणूका होतील की नाही याची शंका आहे. सोबतच भाजपसोबत गेलेल्या नेत्यांना लोकसभेनंतर स्वत:च्या चिन्हावर नाही तर भाजपच्या चिन्हावर लढावे लागले”, असे रोहित पवार म्हणाले.
“आज संध्याकाळी शरद पवार गटाचे नाव कळेल पण चिन्ह आज कळेल की नाही याबाबत माहिती नाही. गटाला जे चिन्ह मिळेल ते सर्वसामान्यांच्या मनातील चिन्ह असेल. जरी घड्याळ आपल्याकडे नसले तरी वेळ आपलीच आहे”, असेही रोहित पवार म्हणाले.