कर्नाटक राज्यात मागच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये काँग्रेस पक्षाने विजय मिळवत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून केंद्र सरकार आणि कर्नाटक राज्य सरकारमधील संबंध फारसे चांगले नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या दक्षिणेकडील राज्यांना कर हस्तांतरणाच्या धोरणांचा विरोध करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे राजधानी दिल्लीमधील जंतरमंतर येथे दाखल झाले आहेत.
बुधवारी दिल्लीतील जंतरमंतरवर कर्नाटक काँग्रेस सरकारच्या केंद्राविरोधात विरोध प्रदर्शन करताना , मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, आमचा मुख्य हेतू राज्य आणि कन्नडिगांच्या हिताचे रक्षण करणे आहे. ”आम्ही नवी दिल्लीमध्ये हे विरोध प्रदर्शन केंद्र सरकारकडे आम्हाला देण्यासाठी असलेला सर्व निधी आहे तो आम्हाला द्यावा याची खात्री व्हावी करत आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की, आमचा मुख्य हेतू राज्याच्या कन्नडिगांच्या हिताचे रक्षण करणे हा आहे, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. आम्ही भाजपा खासदार आणि आमदारांना देखील या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले असून, राज्याच्या अधिकारांसाठी त्यांनी आमच्याबरोबर यावे.”
गेल्या वर्षी केंद्र सरकारने अप्पर भद्रा योजनेसाठी ५,३०० कोटी रुपयांची घोषणा केली. मात्र अद्याप त्यातील एकही रुपया आम्हाला मिळालेला नाही. दुष्काळ निवारणासाठी देखील पैसे मिळाले नाहीत. पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, “राज्यातील जनतेने आम्हाला दिलेल्या संधीचा न्याय करणे हे आमचे कर्तव्य आहे. केंद्र सरकार संघराज्य व्यवस्थेत न्याय देईल याची आम्ही संयमाने वाट पाहत होतो. त्यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वागावे. राज्य सरकार सर्व पक्षांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी आणि कन्नडिगांना न्याय देण्यासाठी आमंत्रित करत आहे. केंद्र सरकारला आमचे वचन ऐकून घेण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत.”