विशाखापट्टणम कसोटीत आपल्या शानदार गोलंदाजीने संघाला विजय मिळवून देणारा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जसप्रीत बुमराह कसोटीत 9 विकेट्स घेत जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज बनला आहे. ICC ने जाहीर केलेल्या पुरूष कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह हा पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे भारतीय गोलंदाज बुमराह पहिला क्रमांकाचा कसोटी गोलंदाज बनण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दुसऱ्या कसोटीत नऊ विकेट्स घेणाऱ्या बुमराहला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला आणि आता गोलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत तीन स्थानांवर चढून तो नंबर वन बनला आहे. बुमराहने रविचंद्रन अश्विनकडून क्रमांक एकचे स्थान हिसकावून हे स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी मार्चपासून अश्विन पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज होता पण विशाखापट्टणम कसोटीत तो भारतासाठी फक्त तीन विकेट घेऊ शकला होता, त्यामुळे तो दोन स्थानांनी घसरून तिसऱ्या स्थानावर आला आहे.
तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. बुमराहने अव्वल रँकिंग मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा बुमराह हा भारतातील चौथा आणि पहिला वेगवान गोलंदाज आहे. तसेच अश्विन, रवींद्र जडेजा आणि बिशन बेदी हे आशियाई देशातील एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी यापूर्वी अशी कामगिरी केली आहे.
बुमराहचे सध्या 881 रेटिंग गुण आहेत आणि तो सध्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या कागिसो रबाडाच्या (851) पेक्षा 30 गुणांनी पुढे आहे. अशा स्थितीत बुमराहने उरलेल्या तीन सामन्यांमध्ये आपली कामगिरी कायम ठेवली तर तो रबाडा आणि इतर गोलंदाजांपेक्षा इतका पुढे असेल की भविष्यात त्याच्या रेकॉर्ड मोडणे कदाचित सोपे होणार नाही.