जागतिक पूज्य संत महंत स्वामी महाराज हे नवनिर्मित बीएपीएस हिंदू मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी अबुधाबीला पोहोचले आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी त्यांचे अबुधाबीमध्ये राज्य पाहुणे म्हणून स्वागत करण्यात आले. तसेच येत्या 14 फेब्रुवारीला मंदिरात अभिषेक सोहळा पार पडणार आहे. मंदिराच्या या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.
महंत स्वामी महाराज यांचे विमानतळावर युएईचे सहिष्णुता मंत्री शेख नाहयान मुबारक अल नाहयान यांनी स्वागत केले. पूज्य महंत स्वामी महाराजांचे स्वागत केल्यानंतर शेख नाहयान म्हणाले, “U.A.E. मध्ये आपले स्वागत आहे. तुमच्या उपस्थितीने हा देश पवित्र झाला आहे. तुमच्या शुभेच्छांनी आम्ही भारावून गेलो आहोत. तुमचे आशीर्वाद आम्हाला जाणवत आहेत.” यावर महंत स्वामी महाराज त्यांना म्हणाले, “तुमचा स्नेह आणि आदर हृदयस्पर्शी आहे.”
राज्य अतिथी म्हणून परमपूज्य महंत स्वामी महाराज यांचे पारंपरिक अरबी सांस्कृतिक शैलीतील अल-अय्याला येथे नर्तक, ढोलकी वादक आणि गायकांनी जंगी स्वागत केले.
दरम्यान, या प्रतिष्ठित हिंदू मंदिराच्या उद्घाटनानिमित्ताने संवादोत्सव साजरा केला जाणार असून त्याअंतर्गत श्रद्धा, सेवा मूल्ये रुजवण्यासाठी विविध मनोरंजक कार्यक्रम आणि सामुदायिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. मंदिर प्रकल्पाचे व्यवस्थापन करणारे ब्रह्मविहारी स्वामी म्हणाले की, अबुधाबी येथील बीएपीएस हिंदू मंदिर भूतकाळातील समृद्ध वारसा साजरे करून आणि भविष्यासाठी मार्गदर्शन करणारे, जागतिक सौहार्दाचे आध्यात्मिक बेट म्हणून उदयास आले आहे.