ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणी तब्बल पाच वेळा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र पाचही वेळा केजरीवाल ईडीसमोर हजर झाले नाहीत. मात्र आता अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे पाच वेळा समन्स बजावून देखील हजर न राहिल्याप्रकरणी ईडीने न्यायालयात केजरीवालांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
ईडीने अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध राउस एव्हेन्यू न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस जारी केली आहे. नवीन उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने तब्बल ५ वेळा अरविंद केजरीवालांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. नवीन उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने तब्बल ५ वेळा अरविंद केजरीवालांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर तपास यंत्रणेने न्यायालयात धाव घेतली होती. आज या प्रकरणावर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली आणि कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
राऊस एव्हेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना बजावलेल्या नोटीसवर आम आदमी पार्टीचे वक्तव्य समोर आले आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. कायद्यानुसार कारवाई करणार. ईडीचे सर्व समन्स बेकायदेशीर कसे होते ते न्यायालयाला सांगणार आहे असे पक्षाने स्पष्ट केले आहे.ईडीने 2 नोव्हेंबर 2023 रोजी केजरीवाल यांना पहिले समन्स पाठवले होते आणि ते बेकायदेशीर असल्याचे सांगत ते हजर झाले नाहीत. त्यानंतर 21 डिसेंबर रोजी दुसरे समन्स पाठवण्यात आले मात्र त्याला उत्तर देण्यात आले नाही. तिसरे समन्स 3 जानेवारीला पाठवले होते. या समन्सवरही केजरीवाल चौकशीत सहभागी झाले नाहीत. तर चौथे समन्स 13 जानेवारीला पुन्हा पाठवण्यात आले. याला उत्तर देताना सीएम केजरीवाल म्हणाले की, राजकीय द्वेष आणि अजेंडामुळे हे समन्स पाठवले जात आहेत. भाजपला मला अटक करायची आहे, कारण मी लोकसभा निवडणुकीत प्रचार करू नये.