27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणूकांमध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. तसेच यामध्ये पाच जागा या महायुतीच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या 5 जागांपैकी 3 जागा या भाजपच्या वाट्याला येणार असल्याचे म्हटले जात आहे. अशातच आता राज्यसभेसाठी भाजपकडून 9 उमेदवारांच्या नावाची यादी समोर आली आहे.
राज्यसभेसाठी भाजपकडून 9 उमेदवारांच्या नावाची यादी समोर आली असून ती दिल्लीला पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातून भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे.
भाजपकडून राज्यसभेसाठी पाठवण्यात आलेल्या यादीमध्ये पंकजा मुंडे, नारायण राणे, विनोद तावडे, चित्रा वाघ, अमरीश पटेल, विजय राहटकर, माधव भंडारी, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय या उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.
दरम्यान, आता या नऊ उमेदवारांची यादी दिल्लीला पोहोचली आहे. त्यामुळे आता या 9 उमेदवारांपैकी राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.