आज (8 फेब्रुवारी) संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सातवा दिवस आहे. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 56 राज्यसभा खासदारांच्या निरोपावर आपले मत व्यक्त करत आहेत. तसेच आज राज्यसभेत अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी खासदारांना दिलेल्या निरोपाच्या भाषणात माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग याचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले आहे. मनमोहन सिंग यांनी लोकशाहीला बळ दिले आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, जबाबदारी काय असते हे मनमोहन सिंग यांनी शिकवले आहे. ते खासदारांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहेत. तसेच मनमोहन सिंह यांचे या सभागृहात महत्त्वाचे योगदान आहे.
पुढे ते म्हणाले, मनमोहन सिंग यांनी देशाला आणि या सदनाला दीर्घकाळ मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे मला विशेषत: त्याचे स्मरण ठेवायचे आहे. जेव्हाही सभागृहावर चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची चर्चा नक्कीच होईल.
मनमोहन सिंग यांनी सभागृहात व्हिल चेअरवर बसून मतदान केले आहे. त्यांनी अपले कर्तव्य बजावले आहे. तसेच मनमोहनजींनी लोकशाहीला बळ दिले आहे. सद्गुणी लोकांसोबत राहून आपल्यातलेही गुण वाढले आहेत. जोपर्यंत नद्यांमधील पाणी वाहत राहते तोपर्यंतच ते पाणी पिण्यायोग्य राहते. पण नदी कितीही गोड असली तरी ती समुद्राला भेटली की ती पिण्यायोग्य राहत नाही. हा संदेश नक्कीच प्रत्येकासाठी प्रेरणादायी असेल असे मला वाटते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.