पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत खासदारांना दिलेल्या निरोपाच्या भाषणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची आठवण येईल. तसेच मल्लिकार्जुन खर्गेंनी संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काळी पत्रिका जारी केली. त्याचवेळी मोदींनी काँग्रेसच्या या ब्लॅक पेपरची खिल्ली देखील उडवली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जबाबदारी काय असते हे मनमोहन सिंग यांनी शिकवले आहे. ते खासदारांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहेत. तसेच मनमोहन सिंह यांचे या सभागृहात महत्त्वाचे योगदान आहे.
मनमोहन सिंग यांनी देशाला आणि या सदनाला दीर्घकाळ मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे मला विशेषत: त्याचे स्मरण ठेवायचे आहे. जेव्हाही सभागृहावर चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांची चर्चा नक्कीच होईल. मनमोहन सिंग यांनी सभागृहात व्हिल चेअरवर बसून मतदान केले आहे. त्यांनी अपले कर्तव्य बजावले आहे. तसेच मनमोहनजींनी लोकशाहीला बळ दिले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, खासदार आपला अनमोल वारसा येथे सोडून जातात. हे घर निरंतरतेचे प्रतीक आहे. जे सन्माननीय खासदार जात आहेत त्यांना जुन्या आणि नवीन संसदेच्या दोन्ही इमारतींमध्ये राहण्याची संधी मिळाली आहे. हे सर्व मित्र स्वातंत्र्याच्या सुवर्णकाळाच्या नेतृत्वाचे साक्षीदार म्हणून निघाले आहेत.
काँग्रेसच्या ब्लॅक पेपरवर खिल्ली उडवत पीएम मोदी म्हणाले की, खर्गेजींचा ब्लॅक पेपर हा काळा टीक्का असतो तसा आहे. काळा टीक्का नजर लागू नये म्हणून खूप आवश्यक असतो. आपल्याकडे लहान मुलाला नजर लागू नये म्हणून एक छोटासा काळा टिक्का लावला जातो. तसेच भारत मागील 10 वर्षांत प्रगतीच्या शिखरावर आहे. या प्रगतीला कुणाची नजर लागू नये म्हणून काळा टिक्का लावण्याचा प्रयत्न झाला आहे. यासाठी मी खर्गेंचे आभार व्यक्त करतो. आमच्या प्रगतीसाठी त्यांनी काळा टिक्का लावला त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. कारण एका बुजूर्ग व्यक्तीने हे काम केले आहे त्याचा मला अधिक आनंद होत आहे.
दरम्यान, यूपीएच्या कार्यकाळावर भाजप सरकार संसदेत श्वेतपत्रिका सादर करू शकते. या श्वेतपत्रिकेत यूपीएच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाचा उल्लेख असेल. त्याचवेळी, याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस मोदी सरकारच्या विरोधात ब्लॅक पेपर जारी करू शकते.