राजधानी दिल्लीतील गोकुळपुरी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या बाजूच्या भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज गोकुळपुरी मेट्रो स्थानकावर हा अपघात झाला आहे. मेट्रो स्टेशनचा काही भाग कोसळल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने मृत्यूची पुष्टी केलेली नाही. तसेच या घटनेत दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून सध्या त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने तेथील ढिगारा हटवण्यात येत आहे. सोबतच तेथील रस्ता देखील बंद करण्यात आला आहे. तसेच या घटनेबाबत अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे. याप्रकरणी कायद्याच्या कलमान्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.