देशामध्ये यावर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. एनडीए सरकारने अब की बार ४०० पार चा नारा दिला आहे. तर, ‘इंडिया’ आघाडीत एकत्रित आलेले विरोधी पक्ष पुन्हा भाजप सत्तेत कसे येणार नाही यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. देशातील लहान मोठ्या सर्व विरोधी पक्षांना यासाठी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र जितके नवीन पक्ष ‘इंडिया’ आघाडीत येत आहेत, तितकेच जुने पक्ष आघाडी सोडून जात आहेत असे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. यातच आता टाइम्स नाऊ नवभारतचा एक सर्व्हे समोर आला आहे. यामध्ये देशात एनडीएला आणि राज्यात महायुतीला किती जागा मिळू शकतात याचे आकडे समोर आले आहेत.
टाइम्स नाऊ नवभारतच्या सर्व्हेनुसार, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. या सर्व्हेनुसार एनडीएला ३६६ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ४०० चे लक्ष्य एनडीएला गाठता येणार नाहीये. तर ‘इंडिया’ आघाडीला १०४ ते १०६ जागा तर इतरांना ७३ जागा मिळण्याचा अदांज या सर्व्हेतून देण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक होण्यासाठी अजून दोन ते तीन महिने आहेत. त्यामुळे कदाचित एनडीए ४०० चे लक्ष्य पार करू शकते असा अंदाज आहे. मात्र आताच्या सर्व्हेनुसार केंद्रात पुन्हा एनडीए म्हणजेच भाजपाचे सरकार येताना दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे एनडीएच्या मतांमध्ये ४ टक्क्यांची वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच ओडिशा, तेलंगणा उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात भाजपाला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. आता बिहारमध्ये नितीश कुमार यांनी घरवापसी केल्याने तिथे भाजपला फायदा होऊ शकतो असे म्हटले जात आहे.
महाराष्ट्रात काय होणार?
टाइम्स नाऊ नवभारतने केलेल्या सर्व्हेनुसार, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला ३९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला ९ जागा जागा मिळू शकतात. अजित पवार यांच्या महायुतीत येण्याने फायदा होऊ शकते असे म्हटले जात आहे. दरम्यान २०१९ मध्ये महायुतीने म्हणजे भाजपा-शिवसेनेने लोकसभेत ४१ जागा जिंकल्या होत्या. २०२४ मध्ये मागच्या वेळ पेक्षा जास्त जिंकू असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.