शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. ईडीकडून ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना पक्षप्रवेशासाठी धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. याबाबतची एक पोस्ट त्यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संजय राऊत यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे. येत्या काही दिवसात शिवसेना सोडा, पक्षांतर करा नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे. हा एक प्रकारे दहशतवाद आहे.असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते.”
“रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत. ते लढतील व जिंकतील, आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत”, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील जमिनीच्या भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीची कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची ईडीकडून चौकशी झाली होती. अशातच आता संजय राऊतांनी ईडीवर गंभीर आरोप केला आहे.