दहिसरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटात असलेले विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या एका व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला आहे. आधी अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत मॉरिसने फेसबुक लाईव्ह केले आणि लाईव्ह संपताच त्याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:ला डोक्यात गोळी घालून संपवल्याची माहिती समोर आली आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर दहिसरमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यची घटना घडल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी आरोपी मॉरिसच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. तर पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गोळ्या झाडणारा मॉरिस कोण आहे?
मॉरिस हा दहिसर-बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. तो गणपत पाटील नगरमध्ये काम करत होता. मॉरिस स्वत:ला समाजसेवक म्हणतो. एका वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांच्या विरोधात मॉरिसने दहिसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. तर आपआपसातल्या वादातून मॉरिसने घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.