काल (8 फेब्रुवारी) दहिसरमध्ये धक्कादायक घटना घडली. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे.
अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटात असलेले विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. मॉरिस नावाच्या एका व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. आधी अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत मॉरिसने फेसबुक लाईव्ह केले आणि लाईव्ह संपताच त्याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:ला डोक्यात गोळी घालून आपले जीवन संपवले.
या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच या घटनेची पोलीस कसून चौकशी करत आहेत. राजकीय वैर आणि आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच मॉरिस नोरोन्हाने कट रचून हत्या केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर या आयसी कॉलनीतील प्रभाग क्र.1 मधून विद्यमान नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. पण यंदा मॉरिस नोरोन्हाने याच पदासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मॉरिस आणि घोसाळकर यांच्यात तणाव निर्माण झाला होता. घोसळकरांनी आपल्या पत्नीच्या उमेदवारीचा दाखला देत मॉरिसला प्रभागात निवडणूक लढवू नये असे सांगितले होते. मात्र, मॉरिसने घोसाळकरांची विनंती ऐकण्यास नकार दिला होता. त्यानंतर अनेक बैठका घेऊन मॉरिसला प्रभागातून उमेदवारी देण्यापासून रोखण्यासाठी तडजोड करण्यासाठी घोसाळकरांनी रमकेची ऑफर दिली होती. तसेच त्यांनी मॉरिसला प्रभाग क्र.8 मधून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण मॉरिसने ही ऑफर नाकारली, त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होते.
तसेच मॉरिसवर त्याच्या 14 वर्षांच्या मैत्रिणीने बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्याला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला आणि त्याला अटक झाली. त्यानंतर 90 दिवसांनंतर मॉरिसला जामीन मिळाला आणि त्याची सुटका झाली. पण त्याच्या या अटकेमागे अभिषेक घोसाळकर असल्याचा राग मनात ठेवून मॉरिसने हा सूड घेतला.
गोळ्या झाडणारा मॉरिस कोण आहे?
मॉरिस हा दहिसर-बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. तो गणपत पाटील नगरमध्ये काम करत होता. मॉरिस स्वत:ला समाजसेवक म्हणतो. एका वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांच्या विरोधात मॉरिसने दहिसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. तर आपआपसातल्या वादातून मॉरिसने घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.