केंद्र सरकारने यावर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, डॉ. एमएस स्वामीनाथन यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
चौधरी चरण सिंह यांच्याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, माजी पंतप्रधानांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे हे आमच्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला समर्पित आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे.
ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत किंवा देशाचे गृहमंत्री असोत आणि आमदार म्हणूनही चौधरी चरण सिंह यांनी नेहमीच राष्ट्र उभारणीला चालना दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. आपल्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती त्यांनी केलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्याबाबत पंतप्रधान म्हणाले की, आमचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव गरू यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव गरू यांनी विविध पदांवर भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद व विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आणि देशाच्या समृद्धी आणि विकासाचा भक्कम पाया रचण्यात त्यांचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले.