काल (8 फेब्रुवारी) ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नावाच्या एका व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. आधी अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत मॉरिसने फेसबुक लाईव्ह केले आणि लाईव्ह संपताच त्याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:ला डोक्यात गोळी घालून आपले जीवन संपवले. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी त्यांनी दोन जिवंत काडतुसे आणि 1 पिस्तुल जप्त केली आहे. अशातच आता पोलिसांकडून आरोपी मॉरिस नोरोन्हाच्या पत्नीचा जबाब नोंदवला जात आहे. हा जबाब देत असताना मॉरिसच्या पत्नीने धक्कादायक खुलासा केला आहे.
पोलीस जबाब घेत असताना मॉरिसच्या पत्नीने सांगितले की, अभिषेक घोसाळकर यांच्या विरूद्ध मॉरिसच्या मनात तीव्र संताप होता. मॉरिस बलात्काराच्या गुन्ह्यात साडे चार महिने तुरूंगात राहून आला होता. त्यानंतर जामीनावरती सुटल्यानंतर मॉरिस घरी आला. त्यावेळी तो सारखा म्हणायचा की, मी अभिषेक घोसाळकरला सोडणार नाही, असा धक्कादायक खुलासा मॉरिसच्या पत्नीने केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर या आयसी कॉलनीतील प्रभाग क्र.1 मधून विद्यमान नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. पण यंदा मॉरिस नोरोन्हाने याच पदासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मॉरिस आणि घोसाळकर यांच्यात तणाव निर्माण झाला होता. घोसळकरांनी आपल्या पत्नीच्या उमेदवारीचा दाखला देत मॉरिसला प्रभागात निवडणूक लढवू नये असे सांगितले होते. मात्र, मॉरिसने घोसाळकरांची विनंती ऐकण्यास नकार दिला होता. त्यानंतर अनेक बैठका घेऊन मॉरिसला प्रभागातून उमेदवारी देण्यापासून रोखण्यासाठी तडजोड करण्यासाठी घोसाळकरांनी रमकेची ऑफर दिली होती. तसेच त्यांनी मॉरिसला प्रभाग क्र.8 मधून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण मॉरिसने ही ऑफर नाकारली, त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होते.
तसेच मॉरिसवर त्याच्या 14 वर्षांच्या मैत्रिणीने बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्याला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला आणि त्याला अटक झाली. त्यानंतर 90 दिवसांनंतर मॉरिसला जामीन मिळाला आणि त्याची सुटका झाली. पण त्याच्या या अटकेमागे अभिषेक घोसाळकर असल्याचा राग मनात ठेवून मॉरिसने हा सूड घेतला.