उत्तराखंड राज्यातील हलद्वानी परिसरातील एक अनधिकृत मदरसा तोडण्यासाठी तसेच मलिक बागेत असलेली मशीद तोडण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्री त्या ठिकाणी गेले होते. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. कारवाई करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी पुढे गेले असता सर्व बाजुंनी मात्र अचानक प्रशासनावर आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. सर्व अधिकारी, कर्मचारी कसाबसा आपला जीव वाचून तिथून निसटले. तसेच यावेळी अनेक वाहने पेटवण्याचा प्रकार देखील घडला. आतापर्यंत या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून, 100 पेक्षा अधिक कर्मचारी जखमी झाले आहेत. यामध्ये काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
या हिंसाचाराबाबत राज्याच्या डीजीपींनी मोठे वक्तव्य केले आहे. या प्रकरणातील आरोपींवर एनएसए (NSA) लावला जाईल, अशी माहिती डीजीपींनी दिली आहे. नॅशनल सिक्युरिटी अॅक्टनुसार आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे डीजीपींनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनभूलपुरा येथील हिंसेनंतर तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हलद्वानी शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच हल्लेखोरांना बघताच गोळ्या घालण्याचे आदेश देखील देण्यात आलेले होते.
या सगळ्या प्रकरणानंतर उत्तराखंड सरकार सतर्क झाले आहे. अलर्ट मोडवर आले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या प्रकारानंतर एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत दंगलखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिघडती परिस्थिती पाहून धामी सरकारने राज्यात हाय अलर्ट घोषित केला आहे. तसेच कर्फ्यू देखील लावण्यात आला आहे. पूर्ण परिसरामध्ये निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.
हलद्वानी प्रकरणावर मुख्यमंत्री धामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, जिल्हा प्रशासनाचे पथक बेकायदा अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता तिथे पोलीस आणि काही असामाजिक घटकांमध्ये चकमक झाली. ज्यामध्ये प्रशासन आणि पोलिसांच्या लोकांना गंभीर दुखापत झाली आहे. त्या ठिकाणी तात्काळ निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. सर्वानी शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले आहे. कर्फ्यू लावण्यात आला आहे.