ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नावाच्या एका व्यक्तीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला. आधी अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत मॉरिसने फेसबुक लाईव्ह केले आणि लाईव्ह संपताच त्याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वत:ला डोक्यात गोळी घालून आपले जीवन संपवले. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.
या घटनेनंतर अभिषेक घोसाळकर यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. हत्या करणारा मॉरिस नोरोन्हाचा मृतदेह दहिसर येथील चर्चमध्ये दफन करण्यात येणार आहे. मात्र, याला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे.
दुसऱ्याची हत्या केलेल्या व्यक्तीचा मृतदेह चर्चमध्ये दफन केला जाऊ नये, अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे मॉरिसचा मृतदेह कुठे दफन करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. पण, आता दहिसरच्या लेडी ऑफ द इमॅक्युलेट कँसेप्शन चर्चचे प्रमुख असलेल्या फादर जेरी यांनी मॉरिसचा मृतदेह चर्चेमध्ये दफन करण्यास परवानगी दिली आहे.
दुसरीकडे, अभिषेक घोसाळकर यांच्यावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बोरिवलीतील घोसाळकर यांच्या औदुंबर या निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी देखील घोसाळकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.