अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने म्हणजेच नोकरी घोटाळ्यातील मनी लॉंडरिंग प्रकरणात जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्यामध्ये आरोपपत्र दाखल केले होते. ईडीने दाखल केलेले आरोपपत्र हे एकूण ४,७५१ पानांचे आहे. ईडीने बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांची मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव, ह्रदयानंद चौधरी आणि अमित कात्याल यांची नावे आरोपपत्रात देण्यात आली होती. तसेच एबी एक्सपोर्ट आणि एके इन्फोसिस्टम या दोन कंपन्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. मात्र या प्रकरणाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्यामध्ये ईडीने आरोपी केलेल्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, त्यांची मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. राउज अव्हेन्यू न्यायालयाने या सर्वांना हंगामी जामीन मंजूर केला आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत हा जामीन देण्यात आला आहे.आरोपींच्या नियमित जामिनावर युक्तिवाद करण्यास वेळ हवा असल्याचे सांगत ईडीने न्यायालयाला सांगिले. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने आरोपींना हंगामी जामीन दिला.
ईडीने जमिनीच्या बदल्यात नोकरी या प्रकरणात ८ जानेवारी रोजी आरोपींविरुद्ध समन्स बजावले होते. लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना जमिनीच्या बदल्यात नोकरी हा घोटाळा झाला होता. नोकरी घोटाळ्यामध्ये लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांना जमीन घोटाळ्यामध्ये आरोपी करण्यात आले आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हे प्रकरण कागदपत्रांच्या छाननीच्या टप्प्यावर आहे. ४ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राबडी देवी आणि इतरांना कथित नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्यात नव्या आरोपपत्रासंदर्भात जामीन मंजूर केला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री, त्यांची पत्नी, मुलगा, पश्चिम मध्य रेल्वेचे तत्कालीन जीएम, डब्ल्यूसीआरचे दोन सीपीओ, खासगी व्यक्ती, खासगी व्यक्तींसह १७ आरोपींविरुद्ध न्यायालयामध्ये हे दुसरे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.