काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या कार्यकाळात कोळसा खाणींपासून ते कॉमनवेल्थ गेम्सपर्यंत घोटाळ्यांची शृंखलाच तयार झाली होती. काँग्रेसने देशाच्या नावाला कलंक लावल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कारकिर्दवर एनडीए सरकारने गुरुवारी श्वेतपत्रिका आणली आहे. यावर आज, शुक्रवारी लोकसभेत झालेल्या चर्चेत सीतारामन बोलत होत्या.
यूपीए सरकारच्या कार्यकाळावरील श्वेतपत्रिकेत सरकारने 2014 पूर्वी आणि नंतरचा भारत आणि त्याची अर्थव्यवस्था यांच्यातील फरक तपशीलवार स्पष्ट केले आहेत. श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून केंद्र सरकारने 2024 पूर्वी देशासमोर असलेली आर्थिक आव्हाने आणि 2014 नंतर एनडीए सरकारने या आव्हानांना कसे तोंड दिले आणि समस्यांवर मात केली यावर प्रकाश टाकण्यात आलाय. एकूण 69 पानांची ही श्वेतपत्रिका 3 भागात विभागली आहे. यामध्ये 2004 ते 2014 या काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारला ‘यूपीए- सरकार’ आणि 2014 ते 2024 या कालखंडातील एनडीए सरकारसाठी ‘आमचे सरकार’ असा शब्दप्रयोग करण्यात आलाय.
यावर आज, शुक्रवारी लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान निर्मला सीतारामन म्हणाल्या की, यूपीए सरकारने अनेक घोटाळे केले, मात्र राष्ट्रकुल घोटाळ्याने देशाची प्रतिमा डागाळली. कोळसा घोटाळ्यामुळे देशाचेही मोठे नुकसान झाले. या घोटाळ्यामुळे देशाला बाहेरून कोळशाची मागणी करावी लागली. हे लोक अजूनही सरकारमध्ये असते तर देशाची काय अवस्था झाली असती हे देव जाणो ! असा टोला देखील सीतारामन यांनी लगावला. काँग्रेसने गुटखा बनवणाऱ्या कंपनीला कोळसा खाणी आवंटित केल्याचे त्यांनी सांगितले. कोळशाच्या लिलावात देशाचे मोठे नुकसान झाले आहे. या लोकांनी देश उद्ध्वस्त केला, पण आम्ही कोळशाचे हिरे बनवल्याचे सीतारामन म्हणाल्या. तब्बल 10 वर्षांनंतर नाजूक अवस्थेत असलेली भारतीय अर्थव्यवस्था जगातून बाहेर पडून अव्वल देशांच्या यादीत पोहोचली आहे, असेही अर्थमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान या श्वेतपत्रिकेवर उद्या, शनिवारी राज्यसभेत चर्चा होणार आहे.