बाबा आमटे यांचे नाव माहित नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात तरी नक्कीच नसेल. एक थोर समाजसेवक, कर्म योगी म्हणून ते सर्वांना ज्ञात आहेत.त्यांचे पूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे.अतिशय सुखवस्तू कुटुंबात ते वाढले.. पुढे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. एकदा रस्त्याने जात असताना एका कुष्ठरोग्याची अतिशय दयनीय अवस्था पाहून त्यांचे मन द्रवले. त्यांनी त्याची सेवा केली. ह्या प्रसंगाने त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी उपचार व पुनर्वसन केंद्र सुरू केले.
चंद्रपूर जवळ वरोडा या गावाजवळ आनंदवन येथे त्यांच्यासाठी वसाहत उभी केली. बाबांनी जरुरी पुरते वैद्यकीय शिक्षणही तिथल्या लोकांसाठी घेतले आणि आपले पुढील सर्व आयुष्य याच लोकांसाठी देण्याचा संकल्प केला. कुष्ठरोग्यांवर केवळ उपचार न करता त्यांना मानसिक आधार मिळवून देण्याचे, आत्मविश्वास जागवण्याचे कार्य केले.. त्यांना सुतार काम, विणकाम, चित्रकला, टाकाऊतून टिकाऊ गोष्टी तयार करणे, इतर शोभेच्या वस्तू तयार करणे अशा मार्गाने स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनवले..
आनंदवन च्या खडकाळ जमिनीवर शेतीचे विविध प्रयोग केले .पावसाचे पाणी साठवून कृत्रिम तलाव निर्माण केला.. कर्म हाच देव मानला.. त्यांच्या पत्नी साधना आमटे यांनीही त्यांना त्यांच्या कार्यात पूर्ण साथ दिली.. त्या दोघांनी समाजाने दूर लोटलेल्या या रोग्यांची निस्वार्थ निरलस सेवा केली .अशा लोकांचे ते आश्रय स्थान बनले.. आनंदवना बरोबरच हेमलकसा येथे लोक बिरादरी प्रकल्प चालू केला.. तेथील शाळेत मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते.. .बाबा आमटे पर्यावरण संवर्धनाचे पुरस्कर्ते होते .
त्यांना मॅगसेसे पुरस्कार, जे .डी.बिर्ला पुरस्कार, मानवी हक्क पुरस्कार, आंबेडकर पुरस्कार, पद्मश्री अशा पुरस्कारांनी सन्मानित केले गेले.
आजही हेमलकसा व आनंदवन येथे त्यांची पुढची पिढी कार्यरत आहे.
“देखणे जे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे”
असे अनंत हात बाबांनी त्यांच्या आनंदवनात व हेमलकसा येथे निर्माण केले आहेत..
अशा या महान समाजसेवक व श्रेष्ठ कर्मयोग्याला शतशः वंदन….
सौ. नीला श्री.जोशी. निगडी.
सौजन्य -समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र