सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. खरेतर काल अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. मात्र सरकारने अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढवला आहे. तसेच भाजपाने आपल्या सर्व खासदारांना तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. त्यामुळे आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काहीतरी महत्वाची घोषणा किंवा प्रस्ताव मोदी सरकारकडून मांडला जाण्याची शक्यता आहे. तीन ओळींचा व्हीप हा राज्यसभा आणि लोकसभेतील सर्व खासदारांसाठी जारी करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच अर्थमंत्रालयाने श्वेतपत्रिका काढत २०१४ पूर्वीच्या आधी अर्थव्यवस्था कशी होती याबद्दलची माहिती दिली.
आज काय होऊ शकते?
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. भाजपाने राज्यसभा व लोकसभेच्या सर्व खासदारांना व्हीप जारी केला आहे. आजच्या दिवसामध्ये राम मंदिरावर धन्यवाद प्रस्ताव सादर केला जाण्याची शक्यता आहे. मागच्या महिन्यात २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण केले. तसेच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना देखील करण्यात आली. तब्बल ५०० वर्षानंतर समस्त हिंदू समाजाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यावर आज संसदेत धन्यवाद प्रस्ताव सादर केला जाऊ शकतो. कदाचित दुपारी तीन वाजल्यापासून या प्रस्तावावर चर्चेला सुरुवात होऊ शकते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज संसदेला संबोधित करण्याची शक्यता आहे. नियम १९३ अंतर्गत राम मंदिरावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासाठी ४ तासांचा वेळ निर्धारित केल्या गेल्याचे वृत्त समोर येत आहे.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमचा तिसरा कार्यकाळ फार दार नसल्याचे सांगितले. तसेच तिसरा कार्यकाळ अनेक महत्वाच्या निर्णयांचा असेल असे ते आपल्या भाषणात म्हणाले होते. एनडीएला ४०० पेक्षा जास्त तर भाजपाला ३७० पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सगळ्याचा संदर्भ बघता आज खरेच राम मंदिराच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होणार की मोदी सरकार काही नवीन कायदा किंवा घोषणा करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.