आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे चर्चेत आले होते. मात्र त्यानंतर ते लाच प्रकरणात अडकले. सीबीआयने त्यांच्यावर एफआयआर दाखल केली. मात्र आता समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळतेय. कारण मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर समीर वानखेडे यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त समोर येत आहे.
सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याचा आधार घेऊन ईडीने वानखेडेंवर मनी लॉन्ड्रींग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी सीबीआयने सामी वानखेडे आणि इतर काही जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणार शाहरुख याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. मात्र एसआयटी चौकशी झाल्यानंतर त्याला क्लीन चिट देण्यात आली होती.
काय आहे आर्यन खान ड्रग्ज प्रकरण?
समीर वानखेडे हे अधिकार आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आले होते. एनसीबीने २०२१ साली कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी अनेक कोटींची रोकड व ड्रग्ज एनसीबीने जप्त केले होते. त्यानंतर एनसीबीने आर्यन खानसह इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर एनसीबीने अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार आर्यन खान आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.