यंदा लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. २०१९ मध्ये संसदेत मंजूर केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अधिसूचित करून लागू केला जाईल असे अमित शाह यांनी सांगितले.
अमित शाह हे गोलबल बिझनेस समिटमध्ये बोलत होते. तेव्हा अमित शाह म्हणाले, ”सीएए हा देशाचा कायदा आहे, तो निश्चितपणे अधिसूचित केला जाईल. निवडणुकीआधी हा कायदा अधिसूचित केला जाईल. याबद्दल कोणताही भ्रम करून घेऊ नये.सीएए हे काँग्रेस सरकारचे वचन होते. जेव्हा देशाची फाळणी झाली आणि त्या देशांमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले, तेव्हा काँग्रेसने निर्वासितांचे भारतात स्वागत आहे आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. आता ते मागे हटत आहेत”, असे अमित शाह म्हणाले.
CAA नागरिकत्व देण्यासाठी आणले गेले होते आणि कोणाचे नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही हे अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. ”आपल्या देशातील अल्पसंख्याकांना आणि विशेषतः आपल्या मुस्लिम समाजाला भडकवले जात आहे. CAA कोणाचेही नागरिकत्व हिसकावून घेऊ शकत नाही कारण कायद्यात कोणतीही तरतूद नाही. CAA हा बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये छळलेल्या निर्वासितांना नागरिकत्व देण्यासाठी कायदा आहे”, असे शाह म्हणाले.
नरेंद्र मोदी सरकारने लागू केलेल्या सीएएचा उद्देश हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे आहे, जे बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून स्थलांतरित होऊन ३१ डिसेंबर २०१४ आधी भारतात आले.डिसेंबर 2019 मध्ये संसदेने CAA मंजूर केल्यानंतर आणि त्यानंतरच्या राष्ट्रपतींच्या संमतीनंतर, देशाच्या विविध भागांमध्ये महत्त्वपूर्ण निदर्शने सुरू झाली.