आम आदमी पार्टी (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज जाहीर केले की त्यांचा पक्ष पंजाब आणि चंदीगडमधील सर्व 14 लोकसभेच्या जागा एकट्याने लढवेल.यामुळे लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांची मोट (I.N.D.I.A. Alliance) बांधण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला पुन्हा एका धक्का बसला आहे. राज्यात काँग्रेससोबत युती होणार नसल्याचे स्पष्ट संकेत देत केजरीवाल म्हणाले की, आपला पक्ष येत्या 10-15 दिवसांत सर्व 14 जागांसाठी उमेदवार जाहीर करेल.
“पुढील दोन महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत पंजाबमध्ये 13 आणि चंदीगडमध्ये एक जागा आहे. एकूण 14 जागा आहेत. पुढील 10-15 दिवसात आम आदमी पार्टी सर्व 14 जागांसाठी उमेदवार जाहीर करेल. जसे तुम्ही दोन वर्षांपूर्वी आम्हाला पाठिंबा दिला होता, त्याचप्रमाणे आम आदमी पार्टीला सर्व 14 जागांवर विजय मिळवून देण्यासाठी मी तुमचे आशीर्वाद घेऊ इच्छितो. असे म्हणत केजरीवाल यांनी लोकांना आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे .
‘ झाडू ‘ या पक्षाच्या निवडणूक चिन्हाकडे लक्ष वेधून केजरीवाल म्हणाले,की “आम्हाला सर्व 14 जागा प्रचंड बहुमताने जिंकायच्या आहेत त्यामुळे आम आदमी पक्षाला विजय मिळवून द्यायचा असेल तर आपल्या सर्वांना पूर्ण ताकदीने स्वीप करण्याची गरज आहे,”
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी एकट्या पश्चिम बंगालमधील सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर काहीच दिवसात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष एकट्याने लढणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता आप पक्षाकडून पुढची घोषणा जाहीर झाली आहे.
आप नेते सुशील गुप्ता म्हणाले, “आम्ही हरियाणातील सर्व 90 विधानसभा जागांवर एकटेच लढणार आहोत. लोकसभेबाबत, आम्ही आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला आमची भूमिका कळवली आहे की स्वतंत्रपणे लढण्यासाठी आम्ही मजबूत आहोत आणि सक्षम आहोत.पण तरीही अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेईल.”