येत्या 15 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह अकोला दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पश्चिम विदर्भासह वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यासोबत आयोजित बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह 15 फेब्रुवारीला अकोल्यात येणार आहेत. यादरम्यान ते अकोल्यासह बुलढाणा, अमरावती, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.
अकोल्यात अमित शाह यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुळे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी बी. संतोष हे उपस्थित राहणार आहेत.
अमित शाह हे पाचही लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहेत. तसेच यावेळी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी देखील या बैठकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.