उल्हासनगरमध्ये पोलीस स्थानकात शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह संदीप सरवणकर, हर्षल केणे यांना अटक केली होती. तर आता ठाणे गुन्हे शाखेकडून गणपत गायकवाड यांचा मुलगा वेभव गायकवाडला अटक करण्यात आली आहे.
गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वैभव गायकवाडसह दोघांना अटक केली आहे. पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून दोघांचा शोध घेत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रंजीत यादव आणि वैभव गायकवाड या दोघांना आज उल्हासनगर कोर्टात हजर केले जाणार आहे. महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर वैभव गायकवाड आणि रंजीत यादव हे दोघेही फरार होते. तर आता पोलिसांनी या दोघांचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे.
दरम्यान, उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेचा सीसीटिव्ही व्हिडीओ देखील समोर आला होता. या घटनेनंतर उल्हासनगर परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच व्हायरल झालेल्या व्हिडीओत वैभव गायकवाडचाही समावेश दिसून आला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.