किसान मजदूर मोर्चासह विविध शेतकरी संघटनांची युती असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने 13 फेब्रुवारीला प्रस्तावित मोठ्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाची घोषणा केली आहे. संयुक्त किसान मोर्चाने 200 हून अधिक शेतकरी संघटना एकत्र करून 13 फेब्रुवारी रोजी दिल्लीत धडकण्याची योजना बनविली होती. शेतमालाला हमीभाव मिळण्याचा कायदा करावा, स्वाभीमान आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
या जनआंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. यासह हरियाणातील अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद आणि सिरसा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
दरम्यान, डीजीपी शत्रुजित कपूर यांनी शनिवारी अंबालाजवळील शंभू सीमेवर जाऊन शेतकऱ्यांच्या प्रस्तावित मोर्चाच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत अंबाला परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सिवास कविराज आणि अंबाला पोलीस अधीक्षक जशनदीप सिंह उपस्थित होते.