उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी शनिवारी एक निवेदन जारी करून याबाबतची माहिती दिली आहे.
काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘शिस्तभंगाची तक्रार आणि पक्षाविरोधात वारंवार वक्तव्ये होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन काँग्रेस अध्यक्षांनी प्रमोद कृष्णम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस समितीच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
प्रमोद कृष्णम यांनी अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कौतुक केले होते. 22 जानेवारीला ते अयोध्येला देखील गेले होते. तसेच या कार्यक्रमात सहभागी न झाल्याने कृष्णम यांनी काँग्रेसवर टीका केली होती.
अलीकडेच प्रमोद कृष्णम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्यांना “श्री कल्की धाम” च्या पायाभरणी समारंभासाठी आमंत्रित केले होते. यावेळीचा कृष्णम यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला होता.