आज (11 फेब्रुवारी) पुण्यात ‘स्वराज्य सभे’मध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना मोठा सल्ला दिला आहे. आपण विचारधारा सोडलेली नाही, त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. राष्ट्रवादीने नेहमी वंचितांचा विचार केला आहे, असेही अजित पवार म्हणाले.
यावेळी अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य दिले आहे. तसेच येत्या काळात त्यांनी दोन कोटी घरे बांधण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जे झाले आहे ते मान्य केले पाहिजे. राज्याला त्यांच्या व्हिजनचा फायदा करून घ्यायचा आहे. सध्या पंतप्रधान मोदींना कोणीही दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आपल्याला तिसऱ्यांदा मोदींना निवडून द्यायचे आहे.
पुढे अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले की, कुणाचेही फोन आले तरी हळवे बनू नका. जर आम्ही रोज फोन करायला लागलो तर तेवढे एकच काम करावे लागेल. तरीही आम्ही विकासाचे काम करून देऊ. कोणताही प्रश्न आणला तरी ते काम पूर्ण करून देऊ. आपण नव्या विचाराने पुढे जात आहोत.
थोडी कळ सोसा, नुसते मुख्यमंत्री-मुख्यमंत्री करू नका. आधी पक्ष संघटना मजबूत करण्याकडे लक्ष द्या. आपण विचारधारा सोडलेली नाही. धर्मनिरपेक्षता ही आपली विचारधारा असून फक्त काळानुसार आपल्याला बदलावे लागते. राष्ट्रवादीने नेहमी वंचितांचा विचार केला आहे. तसेच नव्या विचारांनी आपण पुढे चाललो आहोत, असेही अजित पवार म्हणाले.
तसेच शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. आपण शिवरायांचा धगधगता इतिहास जागा करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या काळात महाराजांचा इतिहास कळावा, त्यांचे शौर्य, धैर्य याची माहिती मिळावी यासाठी कार्यक्रम आखले जाणार आहेत, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.