बारामती तालुक्यातील कऱ्हाटी येथे सुनेत्रा पवार याचे एक बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर शाईफेक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे बारामतीत एकच खळबळ उडाली आहे. कऱ्हाटी गावाच्या वेशीवर भावी खासदार सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, अशा आशयाचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर शाईफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
ही धक्कादायक घटना काल रात्री घडली आहे. अजित पवारांचे कऱ्हाटी गावात फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसच्या बाहेर कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांचे बॅनर लावले होते. पण अंधाराचा फायदा घेत काही अज्ञातांनी बॅनरवर शाईफेक करत तिथून पळ काढला.
बॅनरवर ही शाईफेक नेमकी कुणी केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तसेच पोलिसांनी संबंधित बॅनर काढून टाकला आहे.
या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही नेत्याचे बॅनर असले तरी त्यावर शाईफेक करणे हे दुर्दैवी आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी व्हायला पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.