पुणे, 11 फेब्रुवारी : राज्यातील युवक अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. हा प्रतिसाद पाहिल्यानंतर जुन्या मित्रांनी व नेत्यांनी पुनर्विचार केला पाहिजे. ते का उभे आहेत याचा विचार केला पाहिजे असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.
स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे, युवकांनी भूमिका घेतली की त्याची दखल सरकारलाही घ्यावीच लागते. आजचा जमाना तरुणांचा आहे. म्हणून तुमचं योगदान राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली असले पाहिजे. तुम्ही पक्षाचा पाया आहे हेही आवर्जून छगन भुजबळ यांनी सांगितले.
आज युवा मिशन मेळाव्याला स्वयंस्फूर्तीने युवक आले आहेत. मात्र कर्जत- जामखेडचे जागतिक युवा नेते आहेत त्यांच्याकडे पेडवर्कर आहेत अशी कोपरखळीही छगन भुजबळ यांनी लगावली.
ही लोकशाही आहे. जेव्हा पक्षाचे लोक निर्णय घेतात तेव्हा त्यांच्यापाठी जावे लागते. अजित पवार यांच्यापाठी लोक आहेत म्हणुन त्यांना चिन्ह आणि नाव मिळाले आहे. आम्ही बरीच वर्षे पक्षासाठी काम केले म्हणून आमच्याकडे चिन्ह आणि नाव आले हे लक्षात घ्या. भाजपनंतर दोन नंबरवर ग्रामपंचायत निवडणुकीत अजितदादा पवार होते. म्हणून चिन्ह मिळाले आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत त्यात जीवतोड काम करायचे आहे. एकमेकांचे पाय ओढणे बंद करा. खेकड्याच्या वृत्तीने काम करु नका हे मी सतत सांगत आलो आहे. एकमेकांना सहकार्य करा. विचारधारेवर टिका होत आहे मात्र शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारधारेवर आपण काम करत होतो आणि आजही तीच विचारधारा कायम आहे. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेला विकासाचा रोडमॅप आहे त्यावर काम करत आहोत असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही पहिल्यापासून भूमिका आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासंदर्भात कायदा येत आहे त्यालाही आमचा पाठिंबा असणार आहे. लहानसहान समाजाला घेऊन पुढे जावे लागणार आहे त्यावेळी विजयाचा मार्ग मोकळा होणार आहे. या सर्वांची शक्ती अजित पवार यांच्या पाठीशी उभी करायची आहे. शांततेतून सर्वांना घेऊन पुढे गेलात तर विजय आपलाच आहे हे लक्षात घ्या असे सांगत छगन भुजबळ यांनी ‘मत सोच तेरा सपना पुरा होगा की नही’ … जितना संघर्ष बडा होता है उसके जीवनमे अंधेरा आता नही…अशा शायरीने भाषणाचा समारोप केला.