रायगड, 11 फेब्रुवारी : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रायगड जिल्हा प्रशासन आयोजित रायगड महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्या दि.12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता पोलीस परेड मैदान अलिबाग येथे होणार आहे.12 ते 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी केले आहे.
या महोत्सवात आगरी, कोळी संस्कृतीसह विविध लोककला याबरोबरच विशेष निमंत्रितांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि.12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत अलिबाग येथील स्थानिक कलाकारांचा शिवकालीन संस्कृती दर्शविणारा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये मर्दानी खेळ, पोवाडे यांचा समावेश आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत अवधूत गुप्ते यांचा संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.
दि.13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत अलिबाग येथील स्थानिक कलाकारांचा कोळी संस्कृती दर्शविणारा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत अशोक हांडे यांचा मराठी बाणा कार्यक्रम होणार आहे. दि.14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत पारंपारिक लोकनृत्य कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत नंदेश उमप यांचा महाराष्ट्राची संस्कृती कार्यक्रम होणार आहे. दि.15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत स्थानिक कलावंताचा दशावतार कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत रत्नकांत जगताप यांचा महाराष्ट्राची लोकधार संगीत रजनी कार्यक्रम होणार आहे.
दि.16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत स्थानिक कलावंताचा आगरी संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम होणार आहे. तर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 या वेळेत महानाट्य शिवबा होणार आहे.
या महोत्सवात विविध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 1) पेण येथील श्री गणेश मूर्तीकार यांनी घडविलेल्या गणेशमूर्तीचे प्रदर्शन.2) शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, 3) शिवदुर्ग प्रदर्शन,4) स्थानिक बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादन दालन तसेच खाद्यपदार्थ दालन यामध्ये वारली कला, कोकण मेवा, दगडी वस्तू, मातीची भांडी, नारळापासून बनविलेले विविध कलाकुसर वस्तू, स्थानिक मसाले, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू तसेच कृषी प्रक्रीया आधारित विविध दालन. या महोत्सवात 50 बचतगट सहभागी होणार आहेत.