नाशिक, ११ फेब्रुवारी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रा. राम ताकवले संशोधन केंद्र व शिक्षणशास्त्र विद्याशाखा आणि इंडियन असोसिएशन ऑफ टीचर एज्युकेटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आय.ए.टी.ई ची ५६ वी राष्ट्रीय परिषद यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात संपन्न झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कविता साळुंके यांनी केले. प्रा. मोहम्मद मियाँ, अध्यक्ष, आयएटीई, नवी दिल्ली यांनी शिक्षणाच्या पुनर्रचनेसह शिक्षण व्यवस्थेच्या पुनर्रचनेवर आपले विचार मांडले. त्यांनी शैक्षणिक धोरण 2020 चा पाया,शालेयस्तर पूर्वतयारी, मध्मम आणि माध्यामिक टप्पे समजावून सांगितले. सर्व विषयांचा आधार म्हणून प्राचीन भारतीय ज्ञानाचे महत्व देखील त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात नवी दिल्ली येथील, एनआयईपीए च्या कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी, यांनी नविन शैक्षणिक धोरण संरचना आणि भारतीय परंपरा यावर आपले विचार व्यक्त केले. कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे यांनी विविधतेतील एकतेचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्त्व सांगितले.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलानी मार्गदर्शन करताना सांगितले की, नविन शैक्षणिक धोरण राबविण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. नविन शैक्षणिक धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाला जे जे काही करणे शक्य होईल त्यासाठी शासन सतत प्रयत्नशील राहिल. स्कूल कनेक्टच्या माध्यमातून विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी नक्कीच मदत होईल, यासाठी सर्व महाविद्यालये, विद्यापीठामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी नमूद केले.
जगात ज्या ज्या विभागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत अथवा विभागात मागणी असणार आहे, त्यानुसार नविन शैक्षणिक धोरणामध्ये अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यापीठामार्फत सुरू होणाऱ्या ड्रोन अभ्यासक्रमाचे उद्घाटन चंद्रकात पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या मैदानावर ड्रोन उडवून त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
याप्रसंगी मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, प्रा. बी. आर. कुक्रेती, सरचिटणीस, आयएटीई, कुलसचिव श्री. दिलीप भरड, डॉ. संजीवनी महाले, संचालक, शिक्षणशास्त्र विद्याशाखा हे देखील मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी पाटील आणि श्रीमती रेणुका चव्हाण यांनी केले.