पुणे 11 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत जाऊन ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. योगी आदित्यनाथ यांनी आळंदीत सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवाला उपस्थिती लावली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत लहानपणापासून येण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली, अशा भावना योगी आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला गोविंददेव गिरी महाराज, बाबा रामदेव, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घालून सत्कार करण्यात आला.
योगी आदित्यनाथ म्हणाले “मला आज पावन आळंदी भूमीत येण्याचं सौभाग्य लाभलं. मी सनातन धर्मासाठी काम करत आलेलो आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीला नतमस्तक करतो. अगदी लहान होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली. महाराष्ट्रात एकाच कुटुंबात चार संत होऊन गेले. त्यांचा आशीर्वाद आपल्याला शेकडो वर्षांपासून मिळतो आहे. पुढे ते म्हणाले, याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांना रामदास स्वामी यांनी घडवलं. त्यांनी औरंगजेबच्या सत्तेला आव्हान दिले. औरंगजेबला असे मारले की आजपर्यंत औरंगजेबला कोणी विचारलं नाही. महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. कारण इथं संतांचं सान्निध्य आहे असं योगी आदित्यनाथ म्हणाले.